Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कसारा घाटातील प्राचीन घुमटाकार बारव

 मुंबईहून नाशिक महामार्गावर येताना वाटेत कसारा घाट (Kasara Ghat) लागतो. या घाटाचे मूळ नाव ‘थळ घाट’, असे आहे. घाट जेथे संपतो, तेथेच उजव्या हाताला व घाटनदेवी मंदिरापासून १४ किलोमीटर अंतरावर गोल घुमटाकार वास्तू दिसून येते. साधारण उलट्या आकाराची किंवा घुमट समान दिसणारी ही प्राचीन वास्तू कुणाचेही लक्ष वेधते. बारव (Well) मुख्य रस्त्यातून ५० फूट अंतरावरच आहे. पूर्वीच्या काळात वाटसरुंना, यात्रेकरुंना घाटामध्ये विसावा मिळावा व पिण्याच्या पाण्याची (Drinking water) सोय व्हावी, म्हणून ही बारव बांधली आहे. 

जवळपास २५० वर्षांपूर्वी अहिल्याबाई होळकर यांनी ही बारव बांधली आहे. उन्हाळ्यात उंचावर असलेल्या बारवमध्ये भरपूर पाणी आहे. ४० फूट व्यासाची बारव पूर्ण दगडाने सुबक पद्धतीने बांधली आहे. झाड-पाला, जंगली प्राणी पडून पाणी दूषित होऊ नये, तसेच उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये, म्हणून त्यावर तीन बाजूंनी तीन अर्धगोलाकार आकाराच्या खिडक्या सोडत गोल घुमटआकाराच्या खिडक्या सोडत गोल घुमट बनविले आहेत. दगडी शिळा एकमेकांवर ठेवत राजवाडे किंवा महालाच्या घुमटासमान हे छत बनवताना बारवच्या सौंदर्यात अजूनच भर टाकत तिची स्वच्छताही ठेवण्याचे काम केलेले दिसते. बारवेत वर्षभर पिण्यायोग्य पाणी टिकून असते.

घाटातील दोन वाड्यांतील महिला आजही वर्षभर याच बारवमधील पाणी वापरतात. बारव किती खोल आहे, याचा अंदाज त्यात असलेल्या पाण्यामुळे येत नाही. मात्र, आजही बारव स्वच्छ व सुंदर असून, तिच्यात थोडीही पडझोड झालेली नाही. बारववर कुठेही


शीलालेख किंवा नक्षीकाम नाही. या बारवचे निर्माण लोकमाता राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केल्यामुळे ‘राणी अहिल्यादेवींची बारव’ या नावाने ओळखतात.

अहिल्याबाई होळकरांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशांमधील अनेक तीर्थक्षेत्रांवर नदीकाठी प्रशस्त दगडी घाट, देखणी मंदिरे व यात्रेकरूंच्या सोयीसाठी पाणपोई व धर्मशाळा बांधल्या. जनतेच्या सोयीसाठी त्यांनी बांधकामे केली आहेत.कसारा घाटातील ही बारव पाहून मनोमन अहिल्याबाईंच्या या कार्याचा गौरव वाटतो.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.