मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असलेल्या एका खासगी बसला आज १ जुलै रोजी पहाटे बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसला आग लागून २५ प्रवाशांचा जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात घडला त्यावेळी बसमध्ये ३३ प्रवासी होते. त्यामधील २५ प्रवासी झोपेतच मृत्यूमुखी पडले. इतर ८ प्रवासी अपघातातून प्राण वाचवण्यात यशस्वी ठरले. सदर खासगी बस (MH २९ BE १८१९) ही समृद्धी महामार्गावरून नागपूरहून पुण्याच्या दिशेने येत होती. दरम्यान, बुलडाण्यातील सिंदखेड राजाजवळ बसचं टायर फुटून ती चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली. पुढे ती एका खांबाला जाऊन धडकली. यानंतर फरपटत एका छोट्या पुलावर जाऊन आदळली.या धडकेत बसची डिझेल टाकी फुटल्याने आणि बस फरफटत असताना ठिणग्या उडाल्याने बसने पेट घेतला. त्यामुळे बहुतांश प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात ८ प्रवाशांनी काच फोडून कसाबसा बाहेर पडत आपले प्राण वाचवले..मृतांची ओळख अद्याप पटवता आलेली नाही. याबाबत तज्ज्ञांक डून तपास सुरू आहे. तर जखमी प्रवाशांवर बुलडाण्यातील रुग्णालयातच उपचार करण्यात येत आहेत, अशी माहिती बुलडाण्याच्या पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली अपघात होण्यापूर्वी काही तास आधी विदर्भ ट्रॅव्हल्स कारंजा येथे जेवणासाठी थांबली होती. त्यानंतर कारंजा जवळ असलेल्या इंटरचेज वरुन समृद्धी महामार्गावर पुण्याला जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती. यानंतर पुढे बुलडाण्याजवळ बसला अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.फायर ब्रिगेडच्या वाहनाने ट्रॅव्हल्सला विझवण्यात आले. ट्रॅव्हल्स मधील होरपळून मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पुढील कार्यवाही प्रशासनाकडून सुरू आहे. प्रशासनाकडून ५ लाखांची मदत
दरम्यान, या अपघात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. याबाबत ट्विट करून मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटलं आहे की बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातानंतर लागलेल्या आगीमध्ये बसचा कोळसा झाल्याचं भीषण दृश्य फोटोंमधून पाहता येऊ शकतं.
समृद्धी महामार्ग ठरत आहे प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा !!!! समृद्धी महामार्गावर अपघात घडला नाही असा क्बाचितच एखादा दिवस जात आहे. आज बुलडाण्या जवळ अपघातात २५ प्रवाशांनी आपला जीव गमावला , काल कोपरगाव जवळ ट्रॅक्स क्रुझर आणि आयष्य टेम्पोचा अपघात होऊन नवरा बायको आणि १८ महिन्याच्या बालकासह संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडले. समृद्धी – अपघात आणि मृत्यू असे जणू समीकरण तयार होत आहे. अपुऱ्या सुविधा आणि भारतीय वाहने, भारतातील वातावरण ,भौगोलिक परिस्थिती , भारतीयांची मानसिकता , आर्थिक परिस्थिती याचा कोणताही सारासार विचार न करता केवळ राजकीय इच्छाशक्ती दाखविण्यासाठी आणि मोठ्या कंत्राटदारांचे भले करण्यासाठी आणि टोल वसुलीतून सर्वसामान्यांचे खिसे खाली करण्यासाठीच हा महामार्ग बनवला आहे कि काय ? असा प्रश्न आता स्वसामन्यांना पडू लागला आहे. कारण नागपूर ते घोटी पर्यंत या महामार्गावर अपघात न घडला असा क्वचितच एखादा दिवस जात आहे. यामध्ये आतापर्यंत कित्येक प्रवाशांचे जीव गेले . लाखो रुपये किमतीच्या वाहनांचे नुकसान झाले . समृद्धीमुळे वेळ इंधन वाचवून देशाची शान वाढवल्याचे श्रेय घेणारे या जीवित आणि वित्त हानीची जबाबदारी घेणार असा सवाल आता विचारला जात आहे ? यावर बरीच मंडळी वाहन आणि वाहन चालकांना दोष देतात . १५० किलो मीटर प्रतितास वेग असलेला महामार्ग बनवायचा आणि १०० कि. मी. वेग मर्यादा घालायची याचा अर्थ काय ? तर मग ७ तासात नागपूर ते मुंबई प्रवास या जाहिरातीचे काय ?