प्रतिनिधी : - शिरूर येथील साईभक्त शेतकरी रवि नारायण करगळ यांनी साधारणतः २ लाख २ हजार किमंतीचे २५२७ किलो केशर आंबे श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या प्रसादालयात देणगी स्वरुपात दिले असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.
सदर साई भक्त चार ते पाच वर्षापासून सेंद्रीय पध्दतीने पिकविलेले आंबे देणगी स्वरूपात संस्थान प्रसादालयासाठी देत आहेत. मागील वर्षीही श्री करगळ यांनी सुमारे ४ लाख २५ हजार रुपये किंमती ५००० किलो केशर आंबे देणगी स्वरूपात दिले होते त्याचा एक लाखाहूनअधिक साईभक्तांनी लाभ घेतला होता. देणगी स्वरुपात प्राप्त झालेले केशर आंबे रासायनिक प्रक्रिया न करता, नैसर्गिकरित्या पिकविलेले व उच्च प्रतीचे आहेत.
आजपासून संस्थानच्या साई प्रसादालयात संस्थान कर्मचा-यांचे श्रमपरिहारासाठी व साईभक्तांच्या प्रसाद भोजनासाठी या आंब्यांच्या रसाचा समावेश करण्यात आला असल्याचे सांगून सर्वांनी या प्रसाद भोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.