Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर

दोन-तीन दिवसांपासून "बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला " ही लावणी गातांना एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. कोण आहे ही महिला तिचे नाव काय ती राहते कुठे याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. तेव्हा जुन्या जाणत्या तमाशा कलावंतांनी सांगितले की ही तर शांताबाई कोपरगावकर...

मग मी शांताबाई विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी शांताबाई चा व्हिडिओ मी कोपरगावच्या अनेक व्हाट्सअप ग्रुप वरती टाकला तो व्हिडिओ व्हाट्सअप ग्रुप वरती व्हायरल होताच अनेकांनी मला फोन करून सांगितले की शांताबाई कोपरगावला या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी आहे. मग सुरु झाला शांताबाई चा शोध घेण्याचा कार्यक्रम..माझी व माझे मित्रांची नजर शांताबाई ला कोपरगावत शोधू लागली माझी नजर शांताबाई ला अशी काही शोधत होती की जणू मला खूप मोठे घबाड सापडणार होते आणि अखेर शांताबाई कोपरगावच्या विघ्नेश्वर चौकात आढळून आली. तिला बघताच क्षणी मला खूप आनंद झाला आणि वाईटही वाटले की एकेकाळी तमाशाचा रंगमंच गाजवणारी ही बाई आज अशा वाईट अवस्थेत जगते आहे. मी घाबरतच तिच्या संगती बोलण्याचा प्रयत्न केला कारण मला अनेकांनी सांगितले होते की तिचे मानसिक संतुलन बिघडलेले असून ती खूप घाण घाण शिव्या देते. परंतु दोन तासांच्या आमच्या मुलाखतीत तिने एकही शब्द वाईट उच्चारला नाही. उलट तिने आम्हास अनेक लावण्या, लोकगीते, हिंदी गीते ऐकवली. आम्ही ज्या चहाच्या हॉटेल वरती बसलो होतो तिथे अनेक लोक जमा झाले व तेथे दोन तास लावण्यांची मैफिलच रंगली होती तिची गाणे गाण्याची पद्धत डोळे व हातांच्या हालचाली तिची नाजूक अदाकारी बघून मी थक्कच झालो व मला समजले की ही किती महान,कसलेली, मुरब्बी कलाकार आहे. शांताबाईने ३०/३५ वर्षापूर्वी रसूल पिंजारी वडतीकर, भिका भीमा सांगवीकर, धोंडू कोंडू पाटील सिंधीकर, हरिभाऊ अन्वीकर, शंकरराव कोचुरे खिर्डीकर अशा अनेक खानदेशातील नामवंत तमाशा फडात गायन व नृत्याचे चे काम केलेले आहे.सध्या शांताबाई दिवसभर गाणे म्हणत कोपरगावात भटकत असते व रात्री बस स्टॅन्ड वरती झोपायला असते. तमाशा सम्राट शंकरराव कोचुरे यांच्या पत्नीने शांताबाईला बहीण मानलेले असल्याने शांताबाईचे खानदेश मध्ये बऱ्याच दिवस वास्तव्य होते .मुंबईतील लालबाग परळ भागातील हनुमान थिएटर मध्ये ही लावणी सम्राज्ञी शांताबाईने आपली अदाकारी सादर केलेली आहे कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथे राहत असताना त्यांनी कोपरगाव येथे एस.टी. डेपोत कर्मचारी असलेले अत्तार भाई यांच्यासोबत तमाशाचा फडही उभा केला होता. फक्त चैत्र महिन्यात चालणाऱ्या शांताबाई च्या तमाशाचा खूपच गाजावाजा झाला होता. एकेकाळी तमाशा फडाच्या मालकीण असलेल्या, आपल्या रुबाबात तौर्यात वावरणाऱ्या लावणी सम्राज्ञी शांताबाईची आजची परिस्थिती बघवत नाही. ऐन उमेदीच्या काळातील आठवणी सांगताना शांताबाईच्या  डोळ्यात पाणी येत होते. त्यावेळी मलाही गहिवरून आले. कोण कुठली शांताबाई परंतु तिच्यासाठी माझे ही डोळे भरून आले होते. मला शांताबाई जवळून जाऊशी वाटेना. तिच्याजवळून उठूशी  वाटेना. परंतु संध्याकाळ होऊन अंधार पडत चाललेला होता. महाराष्ट्रातील बऱ्याच लोककलावंतांच्या आयुष्यातील उतार वयात असाच अंधार पडत असतो. तो का पडतो कसा पडतो याचा शोध घेणे गरजेचे आहे. लोककलावंतांना उतार वयातही मान सन्मान प्राप्त झाला पाहिजे मानधनाच्या रक्कमेत वाढ झाली पाहिजे यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. काही कलावंतांना मानसन्मान,प्रतिष्ठा, पैसा भेटतो ही परंतु प्रत्येक कलावंतांच्या नशिबी या गोष्टी नसतात. कोपरगावच्याच लावणी सम्राज्ञी कौशल्याबाई कोपरगावकर यांचा दिल्ली येथे दिनांक २२/२/१९६६ रोजी शासकीय कला महोत्सवात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता. त्यावेळी सुशिलाबाई कोल्हापूरकर, मंजुळाबाई कोल्हापूरकर, लक्ष्मीबाई कोल्हापूरकर, शंकरराव जवळकर ,आनंद महाजन, आणि गोडसे हे कला क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. मी दैनिक लोकमत मध्ये लिहिलेल्या एका लेखात कौशल्याबाई कोपरगावकर यांचा उल्लेख केला होता परंतु त्यावेळी मला अनेकांनी वेड्यात काढले होते की अशी बाईच कुणी कोपरगावात होऊन गेली नाही. परंतु काही वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे एका कार्यक्रमानिमित्त कोपरगावला आले असताना त्यांनी कौशल्याबाई कोपरगावकर यांचा उल्लेख करून मी कौशल्याबाई कोपरगावकर यांच्याकडून कलेचे अनेक धडे शिकलो आहे असे आपल्या भाषणात सांगितले होते. तेव्हा अनेकांनी मान्य केले की हो कोपरगावात कौशल्याबाई या लावणी सम्राज्ञी होऊन गेलेल्या असून त्यांनी कोपरगाव चे नाव उज्वल केले आहे. असे अनेक लोक आहेत की आपण त्यांना त्यांच्या कलेवरून त्यांच्या व्यवसायावरून हिनवतो परंतु तेच लोक आपल्या गावचे नाव रोशन करत असतात.

तारुण्यात ज्या लावणी सम्राज्ञी शांताबाई  हिच्या कानी टाळ्या शिट्ट्यांचा आवाज आणि वन्समोर चे शब्द पडत होते तिच्याच कानी   आज नाची,तमाशावाली असे शब्द पडतात. परंतु जेव्हा कोपरगावचा किंवा तमाशा कलाक्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा शांताबाई बरोबर च कोपरगावचे नाव ही सुवर्ण अक्षराने लिहिले जाईल यात शंका नाही.

   सप्तसूर छेडणाऱ्या शांताबाई चे आज सूर हरवले आहेत, दिव्यांच्या झगमगाटात आपली अदाकारी सादर करणाऱ्या शांताबाई च्या जीवनात आज अंधार आहे, रंगमंचावर मखमली साड्यात वावरणाऱ्या शांताबाई ची साडी आज फाटलेली व मळलेली आहे. ५०/६० कलावंतांचे पोट भरणाऱ्या शांताबाई चे पोट आज रिकामे आहे. कोपरगावात तुम्हाला शांताबाई कुठेही भेटली तर तिला आर्थिक मदत करा , तिला काहीतरी खायला द्या हीच सर्वांना कळकळीची नम्र विनंती. 

  (शब्दांकन अरुण खरात  चांदेकसारे, कोपरगाव

   मो. 9960838433)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.