कोपरगाव -कोपरगाव नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीचे काम चालू असून, या कामामुळे कोपरगाव नजीक पुणतांबा चौफुली येथे सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांचे खूपच हाल होत आहेत. कोपरगावच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे या सोमवारी दुपारी कोपरगावहून शिर्डीकडे जात असताना त्यांना पुणतांबा चौफुली येथे ट्रॅफिक जाम झाल्याचे पहावयास मिळाले. नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदाराने त्वरित पूर्ण करावे आणि या महामार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने उपाययोजना करावी, अशा सूचना स्नेहलताताई कोल्हे यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. नगर-मनमाड महामार्ग हा उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. नगर-मनमाड महामार्गावर कोपरगाव, शिर्डी, शनी शिंगणापूर यासारखी जागतिक दर्जाची अनेक धार्मिक स्थळे आहेत. या धार्मिक स्थळामुळे तसेच वाढत्या औद्योगिकरणामुळे नगर-मनमाड महामार्गावर वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा हा जवळचा रस्ता असल्याने या महामार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. नगर-मनमाड महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून दुरवस्था झाल्याने अपघाताचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. खड्डे आणि वाहतूक कोंडी अशा अडथळ्यांचा सामना करत वाहन चालवणे चालकांना त्रासदायक ठरत आहे. नगर-मनमाड महामार्गाचे रुंदीकरण, दुरुस्ती व मजबुतीकरणाचे काम तात्काळ करावे, अशी मागणी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. कोल्हे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.भारतीय राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणअंतर्गत नगर-मनमाड महामार्गावर सावळी विहीर ते कोपरगाव या पहिल्या टप्प्यातील रस्ता दुरुस्तीचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यासाठी काही ठिकाणी रस्ता खोदण्यात आला आहे