डॉ. सलीम अली हे भारतातील आद्य पक्षी शास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी होते. त्यांना 'बर्डमॅन ऑफ इंडिया' असे ही संबोधले जाते. त्यांनी भारतातील ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतातील पक्ष्यांचा आढळ, त्यांच्या सवयी, पक्ष्यांच्या विविध जाती आणि जातींमधील वैविध्य यांचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या ह्या कार्याने भारतात हौशी पक्षिनिरीक्षक बनण्याची परंपरा चालू झाली. भारतातील हे पक्षी निरीक्षक सलीम अली यांना आद्य गुरू मानतात. डॉ. अली आपण पक्षी निरीक्षणाकडे कसे वळलो याचे वर्णन आपल्या आत्मचरित्रात करतात. मुंबईच्या खेतवाडी मध्ये अली यांचा जन्म झाला. लहानपणी भेटवस्तू म्हणून दिलेल्या छर्ऱ्याच्या बंदुकीने लहान पक्षी टिपायचे हा त्यांचा छंद होता. एके दिवशी टिपलेल्या चिमण्यांमध्ये त्यांना वेगळी चिमणी मिळाली. हिच्या गळ्यापाशी पिवळा ठिपका होता. नेहेमीपेक्षा हा पक्षी वेगळा दिसल्याने त्यांची उत्सुकता चाळवली व त्यांनी त्यांच्या मामांकडे हा पक्षी कोणता याची विचारणी केली. मामा त्याला थेट बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या संचालकांकडे घेऊन गेले. तेथे संचालकांनी छोट्या अलीला हा पक्षी कोणता हे सविस्तर सांगितले, तसेच भुसा भरलेल्या पक्ष्यांचा संग्रह दाखवला. भारवललेल्या सलीम अलींना पक्ष्यांची जी भुरळ पडली ती कायमचीच.सलीम अली दहा वर्षाचे असताना त्यांच्या आई-वडिलांचं निधन झालं त्यामुळं आर्थिक कारणामुळं त्यांचं शिक्षणही पूर्ण होऊ शकलं नाही. नंतर भावाच्या व्यवसायात मदत करण्यासाठी ते बर्मा इथं गेले. परंतु तिथंही सलीम यांचं मन रमलं नाही. इथं बराच वेळ ते पक्षी पाहण्यात घातवत असत. त्यामुळे त्यांना मुंबईला पाठवण्यात आलं. मुंबईत आल्यानंतर त्यांनी प्राणी विज्ञानाचा अभ्यास सुरू केला. त्यानंतर 'प्रिंस ऑफ वेल्स म्यूजियम'च्या इतिहास विभागात काही काळ नोकरीही केली. त्या काळात डॉ.इरविन स्ट्रॅसमॅन हे जर्मनीचे एक प्रसिद्ध पक्षी अभ्यासक होते. पक्ष्यांवरील प्रेम सलीम अली यांना डॉ.इरविन यांच्या पर्यंत घेऊन गेलं. सलीम यांनी एक वर्षभर डॉ.इरविन यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष्यांचा अभ्यास केला.जर्मनीला गेल्यामुळं 'प्रिंस ऑफ वेल्स म्यूजियम' मधील सलीम यांची नोकरी गेली. त्यामुळं त्यांनी आपला मुक्काम मुंबईहून अलिबाग जवळील किहीम येथे पत्नीच्या घरी हालविला. इथंही त्यांनी पक्षी निरीक्षणाला जास्तीत जास्त वेळ दिला. किहीम येथील वास्तव्यानंतर सलीम यांनी सुगरण पक्षावर आधारित एक शोध निबंध बीएनएचएसच्या जर्नलसाठी लिहिला. या शोधनिबंधामुळं जगाला खर्या अर्थानं 'पक्षीतज्ञ सलीम अली’ यांची ओळख झाली. त्यांनी पक्ष्यांना केवळ टिपून तयांत भुसा भरून संग्रहालयात ठेवण्यासाठी पक्षिशास्त्र नाही हे जगाला दाखवून दिले व एकूणच पक्षिशास्त्रालाच वेगळी दिशा दिली.
या नंतर १९३० च्या सुरुवातीला सलीम अलींना ब्रिटिश सरकार पुरस्कृत तसेच संस्थाने पुरस्कृत पक्षी मोहिमांवर बोलवणे येऊ लागली. अलींनी या मोहिमांवर आपण नोंदी तसेच पक्ष्यांचा जीवनशैलींवर अभ्यास करणार असल्याचे स्पष्ट केले, केवळ पक्षी टिपून नोंदी ठेवण्यात आपल्याला रस नाही, ते काम कोणीही स्थानिक कामगार करू शकेल असे स्पष्ट केले. आता अली सर्वमान्य पक्षी शास्त्रज्ञ झाल्यामुळे तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली व सलीम अलींचे पक्ष्यांचे खरेखुरे काम सुरू झाले. या नंतरच्या काळात भारताच्या मोठ्या भूभागावर त्यांनी पक्षी निरीक्षण मोहिमा आखल्या. देशाच्या वायव्य सरहद्दीपासून ते केरळच्या जंगलांपर्यंत तसेच कच्छच्या दलदलीपासून पूर्वेकडे सिक्कीम व अरुणाचल पर्यंत जाऊन त्यांनी पक्ष्यांच्या नोंदी केल्या. पक्ष्यांचे वर्तन, त्याच्यांत हवामानानुसार होणारे बदल, स्थलांतराच्या सवयी, विणीचे हंगाम यावर मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा केली. १९४३ मध्ये लिहिलेले 'द बुक ऑफ इंडियन बर्ड्स' हे पुस्तक आजही पक्षी ओळखण्यासाठी पहिल्या पसंतीचे आहे .१९५० व ६० च्या दशकात जेव्हा भारतात पर्यावरण हा शब्द अस्तित्वातच नव्हता त्यावेळेस भरतपूरच्या केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यान तसेच केरळ मधील सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानात तत्कालिन होणारे पर्यावरणास हानीकारक प्रकल्पांना विरोध दर्शवला. त्यांनी केलेल्या शास्त्रीय वादावर सरकारने नमते घेउन सरकारने हे प्रकल्प स्थगित केले तसेच अंततः त्यांना राष्ट्रीय उद्यानांचा दर्जा देऊन कायमचे संरक्षित केले. अनेक दुर्मिळ प्राणी व पक्षी यांबाबत आपल्या पुस्तकांद्वारे, संस्थेद्वारे केलेले प्रबोधन भारतातील पर्यावरण चळवळीचा पाया ठरले. त्यामुळेच भारतातील आद्य पर्यावरणवाद्यांमध्ये डॉ. अली यांचा समावेश होतो. पक्षीजीवनाच्या या ज्ञानकोशाला मुक्त व्यासपीठ तर्फे आदरांजली !
( वरील माहिती इंटरनेटवरून संकलित करण्यात आलेली आहे)