क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कॅनडा कॉर्नर येथील माध्यमिक विद्यामंदिरच्या उपशिक्षिका सुरेखा रमेश बिडगर ,पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम येत फौजदार बनण्याचे स्वप्न साकार केले.महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०२०मध्ये झालेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. आता पुढील महिन्यात त्यांचे प्रशिक्षण सुरू होणार असल्याचे समजते. श्रीमती बिडगार यांच्या यशाची कहाणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. बिडगर यांनी उसवाड (ता. चांदवड) येथे शालेय शिक्षणानंतर चांदवडच्या नेमीचंद कनिष्ठ महाविद्यालयातून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आई-वडिलांनी मिरगाव (ता. सिन्नर) येथील प्रशांत शेळके यांच्याशी त्यांचा विवाह लावून दिला. परंतु, बालवयापासून शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी लग्नानंतरही शिक्षण सुरू ठेवले. कुटुंबाची जबाबदारी पार पाडत त्यांनी गौतमनगर, कोळपेवाडी येथील सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातून शिक्षण घेतले. पुढे भूगोल विषयात प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी (एम. ए.) मिळवून व नंतर बी. एड. पूर्ण करून आतापर्यंत दोन वेळा शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण केली. या काळातही त्यांनी कधीही वर्गातील पहिला नंबर सोडला नाही. २०१५मध्ये त्यांनी व्ही. एन. नाईक संस्थेच्या विद्यालयात उपशिक्षकेची नोकरी पत्करली. परंतु, खाकी वर्दीविषयी असलेले प्रेम त्यांना स्वस्थ बसू देईना कुटुंबियांची भक्कम साथनोकरी करत असताना व कुटुंबाचा गाडा ओढत असतानाच त्यांनी एमपीएससी परीक्षेच्या अभ्यासात कोणत्याही प्रकारचा खंड पडू दिला नाही. विद्यालयात इयत्ता नववी-दहावीला मराठी आणि भूगोल हे विषय शिकवत असल्याने त्याचादेखील त्यांना फायदा झाला.तसेच, अभियंता असलेले व्यावसायिक पती प्रशांत आणि सिन्नरच्या लोक शिक्षण मंडळातून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेले सासरे शंकर शेळके व सासू नलिनी शेळके यांचाही भक्कम आधार मिळाल्याचे त्या सांगतात.वडील रमेश आणि आई हिराबाई बिडगर शेतकरी असले, तरीदेखील मुलींनी पुढे गेले पाहिजे या मताचे असल्याने त्यांच्यापासून वैचारिक उभारी मिळाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. दरम्यान, त्यांचा मोठा मुलगा ओम सध्या अकरावीत, तर लहाना जयेश इयत्ता दुसरीत शिकत आहे.ॲंड्रॉईड फोनपासून दूरचहे सर्व यश मिळविताना कोणतेही क्लासेस नाही, कोणतीही अभ्यासिका नाही, फक्त स्वयं अध्ययनाच्या जोरावर त्यांनी हे यश प्राप्त केले. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे तरुण-तरुणी सर्व प्रकारच्या सुविधा असताना व अनेक वर्ष अभ्यास करूनही यश न मिळाल्याने आत्मविश्वास गमावतात.त्यांच्यासाठी बीडगर यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. या यशाचे मुख्य रहस्य म्हणजे अँड्रॉइड फोनपासून आपण नेहमीच दूर राहिल्याचे त्या सांगतात.पीएसआय अंतिम परीक्षेचा निकाल लागेपर्यंत व्हाट्सअप, फेसबुक सारख्या माध्यमांना स्पर्शसुद्धा केला नाही.