पुणे: विमा पॉलिसी सुरू करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका रोगनिदान प्रयोगशाळेतील तज्ज्ञ महिलेची १६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी शर्मा, रोहित मेहता यांच्यासह साथीदारांविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका ५० वर्षीय महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला रोगनिदान करणाऱ्या प्रयोगशाळेत तज्ज्ञ आहेत. त्या सेनापती बापट रस्ता परिसरात राहायला आहेत. महिलेने एका नामांकित कंपनीची विमा पॉलिसी काढली होती. हप्ते न भरल्याने पॉलिसी बंद पडली होती. बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरू करून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. वर्षभरात पॉलिसीतून चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढले.
महिलेकडून वेळोवेळी १६ लाख ३८ हजार रुपये चोरट्यांनी ऑनलाइन पद्धतीने घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण तपास करत आहेत.