पीटीआय, बंगळूरू : अठराशे किलोचे वजन आणि अब्जावधी भारतीयांच्या आशाआकांक्षांसह १४ जुलै रोजी पृथ्वीवरून झेपावलेल्या चंद्रयान-३च्या ‘विक्रम’ लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद अवतरण केले आणि भारताने नवा इतिहास घडवला. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) जाहीर केलेल्या अचूक वेळेवर, सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चंद्रयान चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करत असतानाचा सोहळा ‘लाइव्ह’ पाहणाऱ्या कोटय़वधी भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला.
चंद्रावर पोहोचण्याची किमया करणारा भारत हा चौथा देश असला तरी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘पाऊल’ ठेवणारा भारत पहिलाच. चार वर्षांपूर्वी याच महत्त्वकांक्षेनिशी चंद्रावर झेपावलेले ‘चंद्रयान २’ चंद्राच्या अगदी जवळ असताना कोसळले होते. मात्र, त्या अपयशातून धडा घेत नव्या जिद्दीने, अधिक ताकदीने चंद्रावर पोहोचलेले ‘चंद्रयान ३’ संभाव्य जलस्रोतासह चंद्रावरील असंख्य रहस्यांचा भेद करेल, अशी आशा आहे. अमेरिका, चीन, रशिया या बलाढय़ देशांच्या कोटय़वधी डॉलर खर्चाच्या अनेक मोहिमांतूनही जे साध्य झालेले नाही ते अवघ्या सहाशे कोटी रुपयांत ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी साध्य करून दाखवले. १४ जुलै रोजी ‘मार्क-थ्री’ या प्रक्षेपणयानाच्या मदतीने पाठवण्यात आलेल्या चंद्रयानाने ४१ दिवसांच्या प्रवासात एकदाही निर्धारित मार्गावरून न ढळता, एकही टप्पा न चुकवता चंद्राला गाठले होते. तीच अचूकता बुधवारी अवतरण मोहिमेदरम्यान दिसून आली.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ हे वैज्ञानिक नाटय़ रंगले असताना संपूर्ण देश, जगभरातील शास्त्रज्ञ आणि अन्य देशांमध्ये वसलेले भारतीय नागरिक श्वास रोखून याचे थेट प्रक्षेपण बघत होते. चंद्रयान-२ याच टप्प्यावर अयशस्वी होऊन चंद्राच्या पृष्ठावर कोसळले होते. त्यामुळे यावेळी काय होणार, याची धाकधुक प्रत्येकाच्या मनात होती. अखेर ६.०४ वाजता ‘विक्रम’चे पाय चंद्राला टेकल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बंगळुरूमधील नियंत्रणकक्षात टाळय़ांचा कडकडाट झाला. इस्रोमधील शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांच्या या जल्लोषात क्षणार्धात प्रत्येक देशवासीय सहभागी झाला. ‘ब्रिक्स’ परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्य प्रणालीद्वारे ‘इस्रो’ नियंत्रणकक्षाशी जोडले गेले होते. मोहीम फत्ते होताच पंतप्रधानांनी संशोधकांचे आणि देशवासियांचे अभिनंदन करत भारताच्या संकल्पाची ही पूर्तता असल्याचे गौरवोद्गार काढले.
पुढले पाऊल ‘प्रज्ञान’चे..
‘विक्रम’च्या यशस्वी अवतरणानंतर आता त्यामध्ये बसविलेला २६ किलो वजनाचा ‘प्रज्ञान’ हा रोव्हर चंद्रपृष्ठावर उतरेल. या स्वयंचलित रोव्हरमध्ये कॅमेऱ्यासह अन्य पृथ्थकरण पृत्थकरण पृथक्करण करणारी उपकरणे आहेत. त्याच्या मदतीने चंद्रपृष्ठावरील माती, वातावरण आदीचा अभ्यास केला जाईल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेले पाणी, अन्य महत्त्वाची खनिजे यांची माहितीही ‘प्रज्ञान’च्या माध्यमातून गोळा केली जाईल.
शेवटची १५ मिनिटे..
‘इस्रो’ने जाहीर केल्याप्रमाणे बुधवारी संध्याकाळी ५.४७ वाजता ‘विक्रम’च्या अवतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. चंद्रपृष्ठापासून ३० किलोमीटर उंचीवर असताना लँडर संपूर्णत: स्वयंचलित करण्यात आला. पृथ्वीवरील नियंत्रण कक्षातून त्याला कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाहीत. लँडरची क्षितिज समांतर गती (हॉरिझाँटल व्हेलॉसिटी) कमी-कमी करत त्याची लंब गती (व्हर्टिकल व्हेलॉसिटी) वाढविण्यात आली. त्यामुळे चंद्रपृष्ठाला समांतर असलेले यान उभ्या स्थितीत आले. हे करत असतानाच ते हळू-हळू खाली उतरविले गेले.
दक्षिण ध्रुव महत्त्वाचा का?
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अनेक प्रचंड मोठी विवरे आहेत. त्यामुळेच या भागात आतापर्यंत उतरणे एकाही देशाच्या यानाला शक्य झाले नव्हते.
दक्षिण ध्रुवावरील अजस्त्र विविरांमध्ये मोठय़ा प्रमाणात बर्फ असल्याचे पुरावे संशोधकांना मिळाले आहेत.
या बर्फाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले आणि तो बाहेर काढून वापरणे शक्य झाले, तर भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी त्याचा उपयोग करता येईल.
बर्फ वितळवून पिण्यासाठी तसेच उपकरणे थंड करण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल.
पाण्याचे विघटन करून इंधन म्हणून हायड्रोजन आणि श्वसनासाठी ऑक्सिजनची निर्मिती करता येईल.
हा क्षण ऐतिहासिक असून विकसित भारतासाठी वाजवलेला हा बिगुल आहे. पृथ्वीवर भारताने एक संकल्प केला आणि चंद्रावर त्याची पूर्तता केली. आजवर कोणत्याही देशाला जमले नाही ते भारताने करून दाखवले. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
चंद्रयान-१पासून हा प्रवास सुरू झाला. चंद्रयान-२चे मुख्य यान अद्याप चंद्राच्या कक्षेत असून आपल्या संपर्कात आहे. चंद्रयान-३च्या यशाचा जल्लोष करताना या दोन मोहिमांसाठी मेहनत घेतलेल्यांची आठवणही ठेवली पाहिजे. – एस. सोमनाथ, अध्यक्ष, इस्रो