Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वीट भट्टीवर जन्मलेल्या बांबू कलावंतांचा संघर्ष सिनेमात


 चंद्रपूर : विदर्भातल्या नागभिडसारख्या तालुक्यातील सावरगाव येथे वीट भट्टीवर जन्मलेल्या आणि प्रचंड अभावातून आकाशाला गवसणी घालणाऱ्या बांबू कलावंतांवर थेट सिनेमा आलाय. ‘ताई’ असं शीर्षक असलेल्या या सिनेमात मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीतील दोन दिग्गज अभिनेत्री विभावरी देशपांडे आणि शुभांगी गोखले यांनी कसदार अभिनय केला आहे. जेमिनी कुकिंग ऑईल ने बनविलेला हा सिनेमा केवळ ८ मिनिटांचा असला तरी अत्यंत भावनात्मकरित्या यात अभिनेत्री विभावरी देशपांडे यांनी मीनाक्षीची व्यक्तिरेखा जिवंत केली आहे.

शनिवारी रात्री हा लघुपट यूट्यूब वर रिलिज करण्यात आला. २४ तासात महाराष्ट्र आणि देशासह जगभरातल्या सुमारे ८० हजारहून अधिक लोकांनी हा लघुपट पहिला. महिलांचे जीवन स्वयंपाक घरापर्यंत मर्यादित नसून त्या यापुढे आल्यात तर समाज आणि देशाला भरीव योगदान देऊ शकतात यासाठी बांबू लेडी ऑफ इंडिया मीनाक्षी वाळके प्रमाणे स्त्रियांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन हा लघुपट करतो. या लघुपट निर्मिती प्रक्रियेतील प्रमूख दीपक रमेश यांनी सांगितले की, “गेली वर्षभर यावर काम सुरू होते. सुमारे तीन महिने रिसर्च करून मीनाक्षी यांचे कार्य कर्तृत्व आम्ही लघुपटासाठी निवडले. लोकांचा प्रतिसाद मिळाला तर या लघुपटाचे मोठे स्वरूप बनविण्यावर आम्ही विचार करू.”

मीनाक्षी यांनी जुजबी शिक्षण घेतले. गरीबीवर मात करण्यासाठी कलाकुसर कार्य सूरू केले. दुसऱ्या प्रसूती दरम्यान मुलीचा मृत्यू झाल्यावर अवघ्या चौदाव्या दिवशी मीनाक्षीनी बांबू हाती घेतला. सहा वर्षात ११०० हून अधिक महिलांचे सक्षमीकरण, देशाच्या पहिल्या बांबू क्युआर कोड स्कॅनरसह ५ नवे शोध आणि बांबू राखीचा ब्रँड हे त्यांचे कर्तृत्व आहे. भूतान आणि बांगलादेशच्या सीमेवर विरभूम, पालघर असो की गडचिरोलीच्या भामरागडसह अन्य नक्षलग्रस्त भाग मीनाक्षी तिथे पोहोचल्या.

राहायला स्वतःचे घर नाही, यंत्र नाहीत की काम करायला पुरेशी जागा नाही अश्यात त्यांनी ५ युरोपीय देशात आपल्या डिझाईन एक्सपोर्ट करून इतिहास घडविला आहे. इंग्लंडच्या संसदेत पुरस्कार मिळालेल्या त्या पहिल्या बांबू कलावंत आहेत. ‘आमच्याकडे असे अनेक प्रोजेक्ट येत राहतात. पण “ताई” ची पट कथा जेव्हा आली तेव्हा काहीतरी वेगळे जाणवले. यात भूमिका करताना समरस होण्याचा आनंद घेता आला’, असे प्रख्यात अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.