Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महिला कैद्यांनी विक्रमी ३०० बांबू राख्या बनवल्या; आत्मनिर्भर भारत अंतर्गत उपक्रम

 


चंद्रपूर : इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूरच्या अनोख्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत चंद्रपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील ३२ महिला कैद्यांना बांबूची राखी बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कारागृह अधीक्षक अनुप कुंब्रे यांची संकल्पना आणि इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूरच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला. ख्यातनाम बांबू डिझायनर आणि महिला सक्षमीकरण कार्यकर्त्या मीनाक्षी वाळके यांनी या कैद्यांना त्यांची कला शिकवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृहातील महिला कैद्यांनी तीन दिवसांत ३०० बांबूच्या राख्या बनवून विक्रम केला.

इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूरच्या अध्यक्षा राखी बोराडे व प्रकल्प संचालिका निकिता गुप्ता यांच्या सेवाभावी सहकार्यामुळे ते यशस्वी झाले. या तुरुंगातील महिलांनी बनवलेली राखी हा त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या उपक्रमाचा एक भाग आहे. या राखींची विक्री करण्यासाठी स्टॉल लावण्यात येणार आहे. त्याची रक्कम कल्याण निधीत जमा केली जाईल. कारागृह अधीक्षकांव्यतिरिक्त वरिष्ठ कारागृह अधिकारी सतीश सोनवणे, नागेश कांबळे, ज्योती आठवले, कारागृह शिक्षक संजीव हातवडे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

ज्या कैद्यांना बांबूचे प्राथमिक ज्ञान आहे, अशा कैद्यांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. द बांबू लेडी ऑफ इंडिया मीनाक्षी वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली ३२ पैकी ७ कैदी महिलांनी ३ दिवसांत ३०० राख्या बनवण्याचा विक्रम केला. अशा प्रकारे इतक्या बांबूच्या राख्या बनवणारे चंद्रपूर कारागृह हे देशातील पहिले कारागृह आहे. बांबू लेडी मीनाक्षी वाळके यांनी आतापर्यंत ११०९ हून अधिक महिलांना अशा प्रकारे स्वावलंबी बनवले आहे.


बांबू लेडी मीनाक्षी यांनी भविष्यातही बांबूच्या सहाय्याने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याची कटिबद्धता व्यक्त केली. यावेळी या महिला कैद्यांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. यासोबतच त्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा राखी बोराडे यांच्यासह सचिव अंजली उत्तरवार, खजिनदार सुचिता जेवरकर, कविता झाडे, माजी अध्यक्षा सीमा अग्रवाल, डॉ. मनिषा घुगल, काजल नेरलवार आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.