पुणे : पोटदुखीचा त्रास होत असल्याने एक रुग्ण रुग्णालयात आला. त्याची तपासणी केल्यानंतर त्याचे छाती व पोटातील अवयव सर्वसाधारणा व्यक्तीच्या विरुद्ध दिशेला असल्याचे निदर्शनास आले. ही दुर्मीळ जनुकीय समस्या असून, तिला साईटस इर्न्व्हसस असे म्हणतात. या रुग्णाच्या पित्ताशयातून खडे काढण्याची शस्त्रक्रिया पुण्यातील रुग्णालयात यशस्वीरीत्या करण्यात आली.
या रुग्णाचे वय ७५ वर्षे आहे. हा रुग्ण पोटात दुखत असल्याची तक्रार घेऊन रुग्णालयात आला होता. रुग्णाच्या तपासणीत पित्ताशयात अनेक खडे आढळून आले. त्याच वेळी त्याला साईटस इर्न्व्हसस ही समस्या असल्याचे समोर आले. खराडीतील मणिपाल रुग्णालयातील डॉ. सुधीर जाधव आणि त्यांच्या पथकाने लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया करून या रुग्णाचा जीव वाचवला. या शस्त्रक्रियेद्वारे त्याच्या पित्ताशयातील खडे काढून टाकण्यात आले.
बॅरिॲट्रिक शस्त्रक्रिया सल्लागार डॉ. सुधीर जाधव म्हणाले, की रुग्णामध्ये इन्व्हर्सस आणि डेक्स्ट्रोकार्डिया यांसारख्या समस्या होत्या. त्यामुळे ही शस्त्रक्रिया काळजीपूर्वक करण्याची गरज होती. शस्त्रक्रिया अतिशय अचूक आणि नीट करण्यासाठी आणि अवयव अचूकपणे शोधण्यासाठी योग्य पद्धतींची गरज होती. रुग्णाला शस्त्रक्रिया झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरी सोडण्यात आले.
रुग्णाचे हृदय हे छातीत उजवीकडे होते. या समस्येमुळे पित्ताशयातील खडे काढण्याची शस्त्रक्रिया गुंतागुंतीची बनली. लॅपरोस्कोपिक पद्धतीने ही शस्त्रक्रिया अचूकपणे करण्यात आली. -डॉ. सुधीर जाधव, मणिपाल हॉस्पिटल, खराडी