चंद्रपूर : भारताच्या ‘चांद्रयान-३’ मोहिमेअंतर्गत ‘विक्रम लँडर’चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर २३ ऑगस्ट रोजी यशस्वीरीत्या अवतरण झाले. त्या ‘लँडर’मधील ‘प्रज्ञान रोव्हर’ चंद्राच्या पृष्ठभागावर भ्रमण करून तेथील माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’कडे पाठवणार आहे. सौर ऊर्जेच्या जोरावर प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर मार्गक्रमण करणार आहे. त्यावर ऊर्जा निर्मितीसाठी ‘सोलर पॅनल’ बसवण्यात आले आहे. या सोलर पॅनलच्या निर्मिती प्रक्रियेत योगदान दिलेल्या चमूमध्ये चंद्रपूरच्या शर्वरी गुंडावार हिचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
शर्वरी ही चंद्रपूर येथील श्वेता व शिरीष गुंडावार यांची कन्या. आपल्या देशाची मान अभिमानाने संपूर्ण विश्वात उंचावण्याच्या या मोहिमेमध्ये शर्वरीने सहभाग घेत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी कार्य केले आहे. शर्वरी ही सध्या बंगळुरू येथे इस्रोच्या मुख्यालयात (युआरराव सॅटॅलाइट सेंटर) येथे वैज्ञानिक या पदावर कार्यरत आहे.
शर्वरीची आई श्वेता गुंडावार या सरदार पटेल महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे, तर वडील शिरीष गुंडावार व्यावसायिक आहेत. शर्वरी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. तिचे प्राथमिक शिक्षण चंद्रपुरातील डॉन इंग्लिश स्कूल येथे झाले. दहावीपर्यंतचे शिक्षण तिने नारायणा विद्यालय, चंद्रपूर येथून घेतले. अकरावी व बारावीपर्यंतचे शिक्षण बुटीबोरी येथील इरा इंटरनॅशनल स्कूल येथून घेतले. त्यानंतर फ्युचर विस्टा या संस्थेकडून प्रशिक्षण घेतले. केरळमधील त्रिवेंद्रम येथील इंडियन इन्स्टिटयूट ऑफ स्पेस सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी (आयआयएसटी) येथून बी.टेक. पदवी प्राप्त केली. त्यानंतर तिची इस्रोमध्ये वैज्ञानिक या पदावर निवड झाली.
चंद्रावर गेलेल्या चांद्रयान-३ या मोहिमेत शर्वरीचा सक्रिय सहभाग आहे. प्रज्ञान रोव्हरसाठी लागणारे सौर पॅनल बनविणाऱ्या चमूमध्ये तिने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील निखिल घनश्याम नाकाडे या तरुण अभियंत्याचाही ‘चंद्रयान-३’ मोहिमेत समावेश आहे. जिल्ह्यातील दोन तरुणांनी भारताच्या महत्त्वाकांक्षी आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून जिल्ह्यासाठीही ही बाब अभिमानास्पद ठरली आहे.