मुंबईः खार येथे सहा वर्षांच्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी १७ वर्षांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर विधीसंघर्षग्रस्त मुलाची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पीडित मुलीवर वांद्रे येथील भाभा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून तिची प्रकृती ठीक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आरोपीने पीडित मुलीला घरी बोलावून तिच्यासोबत अश्लील चाळे केले. याबाबतची माहिती पीडित मुलीने कुटुंबियांना दिल्यानंतर तिच्या आजोबांनी याप्रकरणी खार पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार खार पोलिसांनी सोमवारी याप्रकरणी अनैसर्गिक अत्याचार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर विधीसंघर्ष मुलाची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.