बीड : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात चोरी, घरफोडी, दरोड्यासारखे गंभीर गुन्हे करण्यात बेलगावच्या (जि. अहमदनगर) ईश्वऱ्या गण्या भोसलेचा हात आहे. त्याला चार बायका अन् १९ मुले व ८ मुली आहेत. ईश्वऱ्याचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले असले तरी त्याचा आटल्या हा मुलगा कुख्यात गुन्हेगार आहे. पोलिसांवर त्याने अनेकदा हल्ला केला आहे. रविवारी रात्रीही त्याने हल्ला केला, परंतु आष्टी पोलिसांनी त्याला जीव धोक्यात घालून बेड्या ठोकल्या. आष्टी तालुक्यातील शिराळ परिसरात दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या आटल्या ईश्वर भोसले (३२), धोंड्या ईश्वर भोसले (२४) आणि होम्या उद्धव काळे (२६) यांना पोलिसांनी रविवारी बेड्या ठोकल्या तर संदीप ईश्वर भोसले आणि शामुल नवनाथ काळे (रा. वाकी, ता. आष्टी) हे दोघे पळून गेले. राज्यातील इतर जिल्ह्यांत त्यांच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आठवड्यापूर्वी पुणे जिल्ह्यात गोळीबार
साधारण १५ ते २० दिवसांपूर्वी आटल्याने पुणे ग्रामीण हद्दीत भरदिवसा घरफोडी केली होती. यावेळी त्याने हवेत गोळीबार करून धूम ठोकली होती. या प्रकरणात नगर पोलिसांनी भाऊ मिलिंद भोसले व त्याच्या पत्नीला बेड्या ठोकल्या होत्या.