मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली सोज्ज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या अभिनेत्री सीमा देव यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव यांचा मुलगा अभिनय देव यांच्या घरीच सीमा देव यांचं निधन झालं. दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या. तसंच विविध चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा खास ठसा उमटवला होता.
‘आनंद’ या सिनेमात त्यांनी केलेली भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. २०२० मध्ये त्यांना अल्झायमर्स या आजाराने ग्रासलं होतं. अभिनेते अजिंक्य देव यांनीच ट्वीट करुन ही माहिती दिली होती. आज सीमा देव यांची प्राणज्योत मालवली आहे. या बातमीमुळे संपूर्ण सिनेसृष्टीने हळहळ व्यक्त केली संध्याकाळी ५ वाजता शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत सीमा देव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, अभिनेत्री नेहा पेंडसे, गायक अजय गोगावले, बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी यांनी सीमा देव यांचे त्यांच्या बांद्रा येथील निवासस्थानी दर्शन घेतले. याबरोबरच इतरही कलाकार सीमा देव यांना निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क येथे उपस्थित होते.
अंत्यसंस्कारादरम्यान अजिंक्य देव आणि भाऊ अभिनय देव दोघेही प्रचंड भावूक होते. आपल्या आईच्या जाण्याने कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याचं अजिंक्य देव याने व्यक्त केलं. सीमा देव यांचं मूळ नाव नलिनी सराफ असं होतं. ‘आलिया भोगासी’ या चित्रपटातून त्यांनी १९५७ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी पुढे अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमधून काम केलं. ‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’ हे चित्रपट विशेष गाजले. ‘आनंद’ या अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका आजही कायम लक्षात राहते.