Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रेल्वेतील महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आता ‘तेजस्विनी’


 पुणे : रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषत: रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांची छेड काढण्याचे आणि त्यांना लुटण्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने तेजस्विनी पथकाची स्थापना केली आहे. या पथकातील महिला कर्मचारी रेल्वेने प्रवास करून महिलांच्या सुरक्षिततेची काळजी घेत आहेत.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागात रेल्वे सुरक्षा दलाने हे पथक स्थापन केले आहे. या पथकाकडे केवळ प्रवासी महिलाच नव्हे, तर मुलांच्या सुरक्षिततेचीही जबाबदारी आहे. तेजस्विनी पथकाचे काम स्वातंत्र्य दिनापासून सुरू झाले. या पथकात सहायक उपनिरीक्षक पूनम शर्मा आणि दोन महिला कर्मचारी आहेत. हडपसरच्या निरीक्षक प्रीती कुलकर्णी यांच्याकडे या पथकावर देखरेखीची जबाबदारी आहे. तेजस्विनी पथकाकडून दररोज डेक्कन, इंटरसिटी, सिंहगड एक्स्प्रेस आणि दैनंदिन लोकल गाड्यांमधील महिला प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या सुरक्षिततेविषयक अडचणी जाणून घेण्यात येत आहेत.

महिलांवरील हिंसाचाराला आळा घालण्यासाठी रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ आणि विभागीय सुरक्षा नियंत्रण कक्ष क्रमांक ७२१९६१३७७७ उपलब्ध आहेत. याबाबत महिला प्रवाशांमध्ये जनजागृती केली जात आहे. वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त उदयसिंह पवार यांच्या नेतृत्वाखाली हा जनजागृतीचा कार्यक्रम सुरू आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. रामदास भिसे यांनी दिली.

                                                व्हॉट्सॲप समूहाद्वारेही मदत

तेजस्विनी पथकाने एक व्हॉट्सॲप समूह तयार केला आहे. त्यात रेल्वे सुरक्षा दलाचे पुणे, शिवाजीनगर, हडपसर स्थानकांचे निरीक्षक आणि विभागीय सुरक्षा नियंत्रण क्रमांक, निरीक्षक प्रवासी सुरक्षा यांचे क्रमांक आहेत. या समूहात महिला प्रवाशांना जोडण्यात येत आहे. महिलांना मदतीसाठी या समूहाच्या माध्यमातून संपर्क साधता येतो. त्याचवेळी रेल्वे सुरक्षा दलही या समूहाच्या मदतीने महिला प्रवाशांशी संपर्कात राहून त्यांना आवश्यक त्या सूचना देत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.