‘चंद्रयान-३’च्या ‘विक्रम लँडर’चे चंद्राच्या ज्या भागावर अवतरण झाले त्याला ‘शिव-शक्ती स्थळ’ असे नाव देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली. तसेच २३ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अवकाश दिन’ म्हणून साजरा करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. ‘चंद्रयान-२’ ने २०१९ मध्ये चंद्राला जेथे स्पर्श केला त्या जागेचे ‘तिरंगा पॉइंट’ असे नामकरणही मोदी यांनी केले.
‘चंद्रयान-३’ मोहिमेच्या यशानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांना भेटण्यास उत्सुक असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ग्रीसची राजधानी अथेन्सहून थेट बंगळुरू गाठले. ‘इस्रो’च्या यशस्वी कामगिरीबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन-प्रशंसा करताना मोदी काही क्षण भावूक झाले होते. हे यश हा भारतीय अवकाश मोहिमांच्या इतिहासातील असामान्य क्षण असल्याचे उद्गार त्यांनी काढले.‘इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क’मध्ये (आयएसटीआरएसी) पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांच्या समर्पण आणि ध्येयासक्तीची भरभरून प्रशंसा केली. ते म्हणाले की, ‘विक्रम लँडर’चे अलगद अवतरण (सॉफ्ट लँडिंग) हा काही सामान्य पराक्रम नाही आणि तो अनंत विश्वात भारताच्या वैज्ञानिक कामगिरीचा ‘शंखनाद’ आहे. जेथे यापूर्वी कोणीही पोहोचले नाही, तेथे आम्ही पोहोचलो आहोत. आम्ही ते केले जे यापूर्वी कोणी केले नाही. हा आजचा भारत आहे – निर्भय भारत, झुंजार भारत! तत्पूर्वी ‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी मोदींना ‘चंद्रयान-३’ मोहिमेची माहिती दिली.
मोदी म्हणाले, की यानाच्या अवतरणस्थळाला नाव देण्याची शास्त्रीय परंपरा आहे. आपले ‘चंद्रयान-३’चे ‘विक्रम लँडर’ जेथे उतरले त्या जागेचे नाव ‘शिवशक्ती पॉईंट’ देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ‘शिव’मध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे आणि तो पूर्ण करण्याची क्षमता ‘शक्ती’द्वारे मिळते. त्यामुळे चंद्रावरील ‘शिवशक्ती’ स्थळाद्वारे हिमालय कन्याकुमारीशी जोडला गेल्याची भावना अधोरेखित होतेमी तुम्हाला भेटण्यासाठी अधीर आणि उत्सुक होतो. तुमच्या मेहनतीला, समर्पणाला, संयमाला, तळमळीला मी सलाम करतो. तुमच्यामुळे भारत आता चंद्रावर आहे, अशा शब्दांत मोदींनी शास्त्रज्ञांचे कौतुक केले. ‘चंद्रयान-३’च्या यशात महिला शास्त्रज्ञांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची प्रशंसा करताना ते म्हणाले, की देशातील महिला शक्तीने मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
भारतातील लहान मुलांच्या ओठांवरही आज चांद्रयानचे नाव असल्याचे नमूद करून मोदी म्हणाले, की या यशामुळे आज भारतातील मुले शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न पाहत आहेत. १ सप्टेंबरपासून भारत सरकारच्या संकेतस्थळाद्वारे आयोजित चंद्रयान मोहिमेवरील महाप्रश्नमंजुषेत सहभागी होण्याचे आवाहनही मोदींनी विद्यार्थ्यांना केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांच्या सहकार्याने ‘स्पेस टेक्नॉलॉजी इन गव्हर्नन्स’ या विषयावर ‘राष्ट्रीय हॅकाथॉन’ आयोजित करण्याचे आवाहनही मोदींनी इस्रोला केले.तत्पूर्वी मोदींच्या स्वागतासाठी ‘आयएसटीआरएसी’जवळ जलहळ्ळी चौक आणि ‘हिंदूस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’च्या (एचएएल) विमानतळाबाहेर मोठय़ा संख्येने नागरिक राष्ट्रध्वज हाती घेऊन जमले होते. मोदींनी काही अंतरापर्यंत ‘रोड शो’ही केला. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी यावेळी मोदींच्या नावाचा जयघोष केला.
‘भारतातील प्राचीन खगोलसूत्रे शास्त्रीय पद्धतीने अभ्यासावीत’
भारतातील प्राचीन शास्त्र ग्रंथांमध्ये वर्णिलेली खगोलशास्त्रीय सूत्रे वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करून त्यांचा अभ्यास करण्यासाठी नव्या पिढीने पुढे यावे. भारतीय वारसा आणि विज्ञानासाठीही ते महत्त्वाचे आहे, असे मोदी यांनी नमूद केले. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांतील विद्यार्थ्यांवर आज दुहेरी जबाबदारी आहे. भारताकडे असलेला वैज्ञानिक ज्ञानाचा खजिना गुलामगिरीच्या प्रदीर्घ कालखंडात दडपला गेला आहे. स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात आपल्याला हा खजिनाही शोधायचा आहे. त्यावर संशोधन करून, जगाला त्याबद्दल आवर्जून सांगायचे आहे, असे मोदी म्हणाले. भारताची महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान -३ मोहीम’ यशस्वी झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बंगळूरु येथे ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. यावेळी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ उपस्थित होते.
तिरंगा पॉइंट
‘चंद्रयान २’ चंद्रावर ज्या ठिकाणी कोसळले ते स्थळ आता ‘तिरंगा पॉइंट’ नावाने प्रत्येक भारतीयाच्या प्रयत्नांना प्रेरणा देईल. कोणतेही अपयश अंतिम नसते, असा संदेश त्याद्वारे मिळत राहील. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर यश नेहमीच मिळते, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
२ सप्टेंबरपासून सूर्यमोहीम
चंद्रयान-३च्या यशस्वी मोहिमेनंतर इस्रो आता सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य-एल १’ अवकाशयानाच्या प्रक्षेपणाची तयारी करीत आहे. येत्या २ सप्टेंबर रोजी ‘आदित्य-एल १’च्या प्रक्षेपणाचे नियोजन आहे. सूर्याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने या यानाची रचना करण्यात आली आहे.
२३ ऑगस्ट हा आता राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा होईल. दरवर्षी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा उत्सव साजरा केला जाईल. एकविसाव्या शतकात जो देश विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडी घेईल, तो देश प्रगती करेल. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान