गुणवंत विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण
सालेकसा : यंदा अनेक ग्रामपंचायतीवर उच्च शिक्षित युवकांना सरपंच पद भूषविण्याची संधी मिळाली. त्यात नवेगाव आणि नानव्हा येथील सरपंच यांनी हटके निर्णय घेत प्रजासत्ताक व स्वातंत्र्यदिनी दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत प्रथम येणाऱ्या गावातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ग्रामपंचायत ध्वजारोहण करण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार अमृत नवेगाव येथे स्वाती प्रितमलाल मौदेकर या बारावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करणार आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सव वर्षात अनेक कार्यक्रमांचे केले जात आहे. सर्वसाधारणपणे शासकीय, निमसरकारी कार्यालये, शाळा महाविद्यालयांमध्ये महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत, कार्यालय प्रमुख किंवा लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायतीमध्ये त्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण करतात. परंतु महोत्सवात कोणत्याही ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण एका विद्यार्थिनीने करावे, तिला हे भाग्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणारे सालेकसा तालुक्यातील नवेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच मनोज बोपचे हे आहेत. ग्रामपंचायत हद्दीतील कोणताही विद्यार्थी व अथवा विद्यार्थिनी इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत प्रथम आल्यास त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता.
त्याच अंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात ग्रामपंचायत येथे इयत्ता बारावीत प्रथम क्रमांक पटकावणारी स्वाती प्रितमलाल मौदेकर हिच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात ग्रामपंचायत व येणार आहे.
नानव्हा येथे तान्या या अमृत उईके यांच्या हस्ते ध्वजारोहण
तालुक्यातील नानव्हा ग्रामपंचायतचे सरपंच गौरीशंकर बिसेन यांनीसुध्दा दहावी व बारावीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला. यांतर्गत इयत्ता १० वी मध्ये ९० टक्के गुण मिळवणाऱ्या तान्या सेवकराम उईके या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.