नागपूर: यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. आज आपण ही परीक्षा दिलेल्या आयपीएस अर्चित चांडक यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांचा प्रवास नक्कीच प्रेरणा देणारा आहे. आयपीएस अधिकारी अर्चित चांडक हे मूळचे नागपूरचे असून त्यांना नेहमीच मोठे ध्येय साध्य करायचे होते. अर्चित चांडक हे शंकर नगर नागपूर येथील रहिवासी असून त्यांचे शालेय शिक्षण भवन्स शाळेमध्ये पूर्ण झाले.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयआयटीला जाण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले. आयआयटी दिल्लीतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक पदवी पूर्ण केली. २०१२ मधील जेईई परीक्षेत ते शहरातून टॉपर होते. आयआयटीमधून पदवी घेताच इंटर्नशिप सुरू असतानाच एका जपानी कंपनीने ३५ लाख रुपयांचे पॅकेजही देऊ केले होते.
परंतु त्याने आपल्या देशाची सेवा करण्यासाठी ते नाकारले. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करण्याच्या उद्देशाने यूपीएससीची तयारी केली. अर्चित चांडक २०१८ मध्ये यूपीएससी परीक्षेत बसले आणि त्यांनी ऑल इंडिया रँक १८४ मिळवले. आता त्यांची नियुक्ती नागपूरला पोलिस उपायुक्त(डीसीपी) आर्थिक गुन्हे शाखा म्हणून करण्यात आली. त्यांनी यूपीएससीच्या बॅचमेट आयएएस सौम्या शर्मा हिच्याशी विवाह केला. त्या आता नागपूर जिल्हा परिषदेच्या सीईओ म्हणून कार्यरत आहेत.