Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दोन मुलांची आई, सलग १८ वर्षे ठेवला संयम, अखेर ‘वर्दी’चे स्वप्न केले साकार



 नागपूर: ध्येय साध्य करण्यासाठी माणूस कितीही काळ अथक परिश्रम करू शकतो, त्याचे सविता शिंदे मूर्तिमंत उदाहरण. इयत्ता दहावीत इंग्रजीत कमी गुण मिळाल्याने अनुत्तीर्ण झालेल्या सविता यांनी सुरक्षा अधिकारी पदासाठीच्या परीक्षेत राज्यस्तरावर गुणवत्तेची मोहोर उमटवली. दोन मुलांची आई आणि शेतकरी पती यांना सांभाळून आता ‘महाजनको’मध्ये सुरक्षा अधिकाऱ्यांची जबाबदारी सांभाळणार आहे.

सविता शिंदे यांचं माहेर आणि सासर बोरगाव. १२ वी शिक्षण झाल्यानंतर सन २००५ मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यानंतर त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांना दोन मुले आहेत. मोठा पृथ्वीराज नवोदयला शिकून आता इचलकरंजी येथे जेईईची तयारी करतोय, तर छोटा यशराज सध्या पेठेत शिकतोय. दहावीत आलेल्या अपयशानंतर सविता यांच्या मावशी-काकांनी शिकण्यास प्रोत्साहन दिले. किमान पदवीचे शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पदव्युत्तरला प्रवेश घेतला, पण ते अपूर्ण राहिले. पती रणजित यांना शिकण्याची इच्छा असूनही शिकता न आल्याने जिद्दी पत्नीला मात्र त्यांनी शिक्षणासाठी मदत केली.सुरवातीला सुनील सत्रे यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा मार्ग दाखवला. नंतर अभिजित शिंदे यांनी आणि त्यानंतर महाराष्ट्र अकॅडेमीच्या अस्लम सुतार-शिकलगार यांनी त्यांना या प्रवासात मार्गदर्शन केले. पदवीनंतर पीएसआय होण्याची मनीषा बाळगून सविता प्रयत्नशील होत्या. घरची जबाबदारी, संसार-मुले यांचा सांभाळ करत, प्रसंगी शेतीत मदत आणि जनावरांची निगा या सर्वांना तोंड देत सविता यांनी हे यश मिळवले आहे.

इतरांप्रमाणे त्यांनाही ‘वर्दी’चेच आकर्षण होते. परंतु, सुरक्षा अधिकाऱ्यांनाही तसाच सन्मान, दर्जा आहे हे जाणल्यानंतर त्यांनी या पदासाठी तयारी केली. राज्यातून हजारो विद्यार्थी होते. महिलांसाठी एकच जागा होती. खुल्या गटातून राज्यात दुसऱ्या क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या आणि अखेर त्यांचे वर्दीचे स्वप्न साकार झाले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.