Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नाशिकमध्ये २२४ किलो बनावट पनीरसह मिठाई नष्ट, अन्न औषध प्रशासनाची कारवाई

 


नाशिक : सणासुदीचे दिवस सुरु झाल्याने दुग्धजन्य तसेच इतर पदार्थांच्या मागणीत वाढ होत असल्याने अशा पदार्थांमध्ये भेसळ करण्याचे प्रकारही घडत आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरात केलेल्या कारवाईत ५९ हजार ४५० रुपयांचे २२४ किलो बनावट पनीर आणि मिठाई जप्त करुन मुद्देमाल नष्ट करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने देवळाली कॅम्प येथील जसपालसिंग कोहली यांच्या मिठाई पेढीची तपासणी केली असता पेढीत अत्यंत अस्वच्छ वातावरणात पनीरची साठवणूक केल्याचे दिसून आले. संशयावरून अन्न नमुना विश्लेषणासाठी घेत उर्वरीत ३७ हजार ७३० रुपयांचा साठा जागेवरच नष्ट करण्यात आला.

तसेच मे. प्रशांत कोंडीराम यादव या मिठाई उत्पादकाच्या पेढीची तपासणी केली असता विनापरवाना पेढा, अंजीर बर्फी अशा मिठाईची साठवणूक केल्याचे आढळून आले. भेसळीच्या संशयावरून तसेच अनारोग्य ठिकाणी उत्पादन केल्याने अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तसेच २१ हजार ७२० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

दरम्यान, या मोहिमेत तीन नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्नसुरक्षा व मानके कायद्यान्वये पुढील कारवाई करण्यात येणार आहे. धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार असून नागरिकांनी असा काही भेसळीचा, बनावटपणाचा प्रकार आढळल्यास १८०० २२ २३६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.