Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चोंडीतील उपोषणाचा पाचवा दिवस; दोघांची प्रकृती खालावली


जामखेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चोंडी (ता. जामखेड) येथे यशवंत सेनेने बुधवार (दि. ६) पासून धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे (अनुसूचित जमाती) आरक्षण मिळावे यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. रविवारी उपोषणाचा पाचवा दिवस होता. यातील दोघांची प्रकृती खालावली असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान, उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी रविवारी दिवसभरात अकरा जिल्ह्यांतील समाज बांधव, महिला यांनी येऊन पाठिंबा दिला.

धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संसदेत घटनादुरुस्ती करून वटहुकूम काढावा या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने पुण्यश्लोक चोंडी येथे उपोषण सुरू केले आहे. रविवारी उपोषणाचा पाचवा दिवस होता. यावेळी उपोषणकर्ते बाळासाहेब दोडतले म्हणाले, उपोषणस्थळी शासकीय डॉक्टरांच्या पथकाने भेट देऊन सर्वांची तपासणी केली. यामधील प्रदेश सरचिटणीस सुरेश बंडगर यांना सर्दी झाली आहे तसेच मधुमेहाचा त्रास आहे. राष्ट्रीय उपाध्यक्ष अण्णासाहेब रूपनवर यांना थकवा जाणवत आहे. या दोघांची प्रकृती बिघडली आहे, पण त्यांनी आरक्षण मिळेपर्यंत उपचार घेण्यास नकार दिला आहे दोडतले यांनी सांगितले.

धनगर समाजाने आता जागे झाले पाहिजे. आरक्षण मिळवायचे असेल तर सर्व बांधवांनी या लढ्यात सहभागी झाले पाहिजे. केवळ आम्ही पुढाकार घेतला म्हणून नावे न ठेवता आरक्षणाची मशाल पेटली आहे ती अशीच तेवत ठेवण्यासाठी साथ द्या, असे आवाहन दोडतले यांनी केले.

दरम्यान, रविवारी दिवसभर उपोषणस्थळी परभणी, बीड, लातूर, नांदेड, सातारा, जालना, बुलढाणा, जळगाव, सोलापूर, पुणे, धाराशिव येथील समाज बांधवांनी भेट घेऊन चर्चा केली व जाहीर पाठिंबा दिला. यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे, प्रदेश सरचिटणीस सुरेश बंडगर, माणिकराव दांगडे, अण्णासाहेब रूपनवर, गोविंद नरवटे, समाधान पाटील, नितीन धायगुडे, किरण घालमे, बाळा गायके, लक्ष्मण कोकरे, भगवान जऱ्हाड आदी उपोषणाला बसले आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.