Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांची अवैध माया; अपसंपदेचा गुन्हा


नाशिक – महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याकडे कायदेशीर ज्ञात स्त्रोतांपेक्षा ६४ टक्के अधिक म्हणजे जवळपास एक कोटींची मालमत्ता आढळून आली आहे. अवघ्या १३ वर्षातील शासकीय सेवेत धनगर यांनी डोळे दिपविणारी मालमत्ता जमवली. ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक अपसंपदा जमा केल्या प्रकरणी धनगर यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता दुसरा गुन्हा दाखल केला आहे. धनगर यांची सक्त वसुली संचलनालयाकडून (इडी) चौकशीचीही घोषणा झाली आहे.

जून महिन्यात मनपा शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांना ५० हजारांची लाच स्वीकारताना अटक झाली होती. तपासात धनगर यांच्याकडे ८५ लाखाची रोकड, ३२ तोळे सोन्याचे दागिने, सदनिका, भूखंडाचे कागदपत्रे आढळले होते. बँक खात्यात ३० लाखहून अधिकची रक्कम सापडली होती. या कारवाईनंतर धनगर यांच्या कार्यपध्दतीचे अनेक किस्से समोर आले होते. कर्मचाऱ्यांशी त्यांचे वर्तन अतिशय उर्मट होते. एखाद्याचे काम बरोबर नाही, अशी कुणी तक्रार केल्यास त्या लेखी देण्यास सांगत असत. तक्रार प्राप्त झाली की, समोरच्या व्यक्तीवर दबाव आणून त्याच्याकडून पैसे उकळायचे, अशी त्यांची कार्यशैली राहिल्याचे सांगितले गेले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धनगर यांच्या मालमत्तेची उघड चौकशी सुरू केली होती. धनगर या जून २०१० ते तीन जून २०२३ या कालावधीत शासकीय सेवेत कार्यरत होत्या. या कालावधीत कायदेशीर ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक ९६ लाख ४३ हजार ८०९ रुपयांची अपसंपदा त्यांनी जमविल्याचे उघड झाले. कायदेशीर ज्ञात स्त्रोतापेक्षा ६४ टक्के अधिक मालमत्ता त्यांच्याकडे आढळली. यावरून धनगर यांच्याविरुध्द अंबड पोलीस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षिका शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संदीप घुगे यांनी ही चौकशी केली.

दरम्यान, धनगर यांच्यासह शिक्षण विभागातील लाचखोरीचा विषय विधानसभेतही गाजला होता. नाशिक हे शिक्षणाचे केंद्र बनत असताना दुसरीकडे मागील काही वर्षात तीन, चार शिक्षणाधिकारी लाचखोरीत सापडल्याचे समोर आले होते. मनपा शिक्षणाधिकारी धनगर यांच्या मालमत्तेची सखोल चौकशीची मागणी आमदार सीमा हिरे यांनी विधानसभेत केली होती. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर यांचे प्रकरण सक्तवसुली संचलनालयाकडे पाठविले जाईल, असे जाहीर केले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.