‘‘महात्मा गांधी हे अवघ्या जगासाठी अमूल्य ठेवा आणि प्रेरणास्त्रोत आहेत. सध्याच्या युगात गांधीजींनी दाखवलेल्या मार्गावरून चालल्यास विश्वशांतीचे ध्येय गाठता येऊ शकेल,’’ असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी व्यक्त केला. मुर्मू यांच्या हस्ते राजघाटाजवळील महात्मा गांधींच्या १२ फूट उंचीच्या पुतळय़ाचे अनावरण आणि गांधी वाटिकेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना मुर्मू म्हणाल्या, की बापूंचे विचार नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात गांधी स्मृती आणि दर्शन समितीने महत्त्वाचे योगदान दिले आहे. गांधींजींचा हा पुतळा आणि गांधी वाटिका हे या दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. महात्मा गांधींच्या आदर्श आणि मूल्यांनी संपूर्ण जगाला नवी दिशा दिली आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जग जेव्हा तीव्र मतभेद आणि संकटांनी ग्रासले होते तेव्हा गांधीजींनी अिहसेचा मार्ग दाखवला अशी आठवण त्यांनी करून दिली.
स्वावलंबन, ग्रामस्वराज्य, स्वच्छता आदी अनेक विषयांवर गांधीजींनी अनमोल विचार मांडले. महात्मा गांधींनी आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी आणि नैतिकदृष्टय़ा भक्कम भारत निर्माण करण्यावर भर दिला होता. गांधी स्मृती व दर्शन समितीचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गांधीजींचे आदर्श आत्मसात करून भारताच्या विकासासाठी काम करत आहेत ही आनंदाची बाब आहे. सर्व नागरिकांनी विशेषत: तरुण आणि मुलांनी गांधीजींबद्दल जास्तीत जास्त वाचन करून त्यांचे आदर्श आत्मसात करण्याचे आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केले.
गांधी स्मृती आणि दर्शन समितीचे उपाध्यक्ष विजय गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा गांधींचा हा पुतळा ४५ एकर व्याप्ती असलेल्या ‘गांधी दर्शन’ संकुलाच्या प्रवेशद्वारावर आहे. या वाटिकेत पर्यटकांना आपली छबी टिपण्यासाठी ‘सेल्फी पॉइंट’ही तयार करण्यात आला आहे. महात्मा गांधीजींच्या ध्यानस्थ मुद्रेचा हा पुतळा जयपूरच्या कारागिरांनी बनवला आहे.