मराठा समाजाला सरसकट ‘कुणबी’ असे जातीचे दाखले देण्याची मागणी करत मनोज जरांगे पाटील गेल्या १४ दिवसांपासून जालना जिल्ह्यात उपोषणाला बसले आहेत. त्यांनी उपोषण मागे घ्यावं, असं सरकारकडून सातत्याने आवाहन होत असलं तरीही त्यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, कालपासून (१० सप्टेंबर) जरांगे पाटलांनी पाणी आणि औषधाता त्याग केला असून वैद्यकीय तपासणी करण्यासही विरोध केला आहे. याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांची तपासणी करण्याकरता गेलेल्या डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण
महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं आणि मराठवाड्यातील मराठा समजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळावं या मागणीकरता मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून उपोषण धरले आहे. आज उपोषणाचा १४ दिवस आहे. गेल्या १४ दिवसांत बऱ्याच घडामोडी घडून गेल्या. शांततेत सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी १ सप्टेंबर रोजी लाठीमार केला. या लाठीमाराचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. या लाठीमारामुळे मराठा समाज आणखी पेटून उठला. तसंच, यामुळे मनोज जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या उपोषणालाही बळ मिळालं. अनेक राजकीय नेते, पुढारी त्यांच्या उपोषणस्थळी भेट देऊन आले. मराठा समाजाचाही पाठिंबा त्यांना दिवसेंदिवस वाढत गेला. या काळात सरकारने तीन वेळा त्यांचं शिष्टमंडळ जालन्यात जरांगेंशी चर्चा करण्याकरता पाठवलं. परंतु, सरकार जीआर काढत नाही तोवर माघार घेणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली.
सरकार जीआर काढत नाही तोवर उपोषणावर ठाम
जरांगे पाटलांची ठाम भूमिका पाहून सरकारनेही तातडीने आदेश काढून निजामकाळात कुणबी नोंद असलेल्या मराठा समाजातील वारशांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे असा जीआर सरकारने काढला. या जीआरनंतर तरी जरांगे पाटील उपोषण मागे घेतील अशी सरकारची धारणा होती. परंतु, जीआरमधील वंशावळ शब्द काढून तिथं सरसकट हा शब्द टाकावा या मागणीसाठी जरांगे पाटील आग्रही राहिले. कारण, सरकारने काढलेल्या जीआरचा मराठा समाजाला काहीच फायदा होणार नसल्याचे सांगत त्यांनी आपली मागणी लावून धरली. त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांची मराठा समाजातील शिष्टमंडळासोबत दीड ते दोन तास बैठक झाली. या बैठकीतही काहीतरी तोडगा निघेल असं वाटत होतं. परंतु, जरांगे पाटलांसाठी पाठवलेल्या बंद लिफाफ्यातही त्यांची मागणी मान्य झाली नव्हती. त्यामुळे जरांगे पाटलांनी उपोषण सुरूच ठेवले आहे.
अल्टिमेटम संपल्यानंतर औषध-पाण्याचा त्याग
दरम्यान, मनोज जरांगे पाटलांनी सरकारला चार दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. चार दिवसांत सरकारने मागण्या मान्य नाही केल्यातर पाणी आणि औषधांचा त्याग करण्याचा इशारा दिला होता. चार दिवसांचा अल्टिमेटम उलटून गेल्यावरही सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्याने कालपासून त्यांनी पाणीत्यागही केला आहे. तसंच, औषधं घेण्यास नकार दिला असून डॉक्टरांनी लावलेल्या सलाईन काढून टाकल्या आहेत. एवढंच नव्हे तर डॉक्टरांच्या तपासणीलाही त्यांनी विरोध केला आहे. त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टर उपोषणस्थळी दाखल आहेत. परंतु, त्यांनी तपासणी करण्यास ठाम विरोध दर्शवला. त्यामुळे, कालपासून (१० सप्टेंबर) त्यांची वैद्यकीय तपासणी होऊ शकलेली नाही. १४ दिवस उपाशी, पाण्याचा त्याग, औषधांना नकार आणि वैद्यकीय तपासणीला विरोध केल्याने जरांगे पाटलांची प्रकृती बिघडल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
डॉक्टर काय म्हणाले?
“काल एकदा तपासणी झाली. त्यानंतर आमच्याकडून तपासणी होऊ शकली नाही. वैद्यकीय तपासणीसाठी आम्ही त्यांना विनंती करतो आहोत. आज सकाळच्या टीमनेही विनंती केली, पण त्यांनी तपासणीला नकार दिला”, अशी प्रतिक्रिया त्यांना तपासायला आलेल्या वैद्यकीय पथकातील डॉ. अतुल तांदळे या डॉक्टरांनी दिली.“कालपासून पाणीही प्यायले नाहीत. शरीरातील पाण्याची पातळी कमी होणं, ब्लड शुगर लेव्हल कमी होणं या गोष्टींचा थेट संबंध आहे. त्यावरून कळतं त्यांची प्रकृती कशी आहे. वैद्यकीय तपासणी न झाल्याने त्यांच्या प्रकृतीविषयी सांगू शकत नाही. परंतु ब्लड शुगर, ब्लड प्रेशर खालच्या पातळीवर आहे”, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. कालपर्यंत त्यांचं ब्लड प्रेशर ११० च्या लेव्हलवर आणि ब्लड शुगर १०० च्या खाली होता. ते खात नसल्याने लेव्हल खाली जात आहे. ते बसलेले नाहीयत हे चांगलं आहे. बसल्याने कॅलरीज अधिक वापरल्या जातात, असंही डॉक्टर पुढे म्हणाले.
आज सर्वपक्षीय बैठक
मराठा आरक्षण आंदोलनाची व्याप्ती वाढू लागल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, सोमवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती सर्वपक्षीय नेत्यांना देण्यात येणार असून, त्यांच्या माध्यमातून मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या बैठकीला विरोधी पक्षांचे नेते आणि जरांगे कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आ