Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

प्रतीक्षा शिंदे बनली जांबची पहिली डॉक्टर

       

               ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य जपण्याचा मानस

खरंच बाप उमजायला अवघड असतो. तो खडतर परिस्थितीत घरदार-लेकरा बाळांसाठी मरमर झिजत असतो.. घर चालावं अन् पोरांनी चार बुकं शिकून मोठं व्हावं, एवढीच त्याची अपेक्षा असते. त्यात पोरगी तर काळजाचा तुकडाच असतो. तिनं चूल-मूल या पारंपरिक जोखडात न राहता शिक्षणाच्या शिदोरीवर आकाशात स्वच्छंद विहार करावा.. याचंच तो स्वप्न बघत असतो. अशाच बापाचं स्वप्न लेकीनं प्रत्यक्षात साकारलं आहे.. प्रतीक्षा सुखदेव शिंदे जांबची पहिली डॉक्टर झाली आहे.

खटाव तालुक्यातील जांब तसं डोंगराकडेचं दुर्गम भागातलं तसं दुष्काळाचा टिळा माथी मिरवणारं गाव आहे. तशी सगळीच माणसं शेतीवर गुजराण करणारी आहेत. त्यामुळे सक्षम होण्यासाठी केवळ शिक्षण घेतले पाहिजे. तर पुढची पिढी टिकेल यावर सगळ्यांचच एकमत आहे.

तसं सुखदेव शिंदे प्रगतशील शेतकरी आहेत. शेतीत वेगवेगळे प्रयोग करत राजकारणा'चा नाद पण जोपासत असतात. गावच्या 'सरपंच' पदाला पण त्यांनी गवसणी घातली. पण पोरांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं नाही. त्यांची 'लेक' प्रतीक्षा हिनं गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाराखडी गिरवली, तर जांब हायस्कूलमध्ये दहावी पास' केली. त्यानंतर वारणानगर येथील यशवंत मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. प्रचंड मेहनत, कष्ट करत बीएएमएसच्या अंतिम परीक्षेत पहिल्या श्रेणीत ती पास झाली अन् ती जांब गावची पहिली डॉक्टर झाली. तशी शिमग्यात सुद्धा जांबमध्ये 'दिवाळी साजरी झाली.

लेक प्रतीक्षा ही डॉक्टर झाली अन् आईबाप सुखदेव सुनिता यांना लेकीनं अटकेपार झेंडा फडकवला याचा विलक्षण आनंद झाला, कष्टाचं चिज झाले. नकळत शिक्षणासाठी पैसं नव्हतं त्या वेळची ओढाताण, जिवा-भावाच्या दोस्तांनी 'यारी निभवत दिलेला आधार, घरातली खिंड लढवणारे बंधू तानाजी-विजयकुमार, प्रतीक्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटणाऱ्या भावजय उज्ज्वला अन् नीलम यांनी दिलेली खंबीर साथ नजरे समोरून तरळून गेली. तर सिव्हील इंजिनियरिंग करत असलेल्या भाऊ साईराजला 'ताई'चा अभिमान वाटत आहे. दरम्यान, प्रतीक्षानं डॉक्टर होण्यापर्यंतच्या प्रवासात मार्गदर्शन करणारे शिक्षक, आधारवड असलेली परिवारातील माझी माणसं, गावकरी आणि जांबच्या मातीचं यश असल्याचे सांगितले. तर ग्रामीण भागातील लोकांचं 'आरोग्य' जपण्यासाठी 'सेवा' करणार असल्याचा मानस व्यक्त केला. माणसातल्या 'सुखदेवानं काळ्या आईची सेवा करत गावाला गावपण दिलं. तशी 'लेकी'च्या रुपात पहिली डॉक्टर दिली. पंढरपूरचा 'पांडुरंग' जांबच्या 'पांडुरंगाला पावला अन् जांबची प्रतीक्षा संपली. प्रतीक्षा सुखदेव शिंदे जांबची पहिली डॉक्टर झाली...

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.