Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साईनगरीत गर्दी साई-विठ्ठराजाची पालखीतून शाही मिरवणूक

 शिर्डी : साईंना विठ्ठल स्वरूप मानणाऱ्या लाखो भाविकांच्या व शिर्डी पंचक्रोशीच्या दृष्टीने शिर्डी प्रति पंढरपूर आहे. साई मंदिरात रोज गायल्या जाणाऱ्या 'शिर्डी माझे पंढरपूर' या संतकवी दासगणू लिखीत आरतीने व काकड्यातील 'उठा उठा पांडुरंगा' या पदाने भाविकांना नित्य अनुभूती होते. हीच अनुभूती घेत हजारो भाविकांनी बुधवारी आषाढी एकादशीनिमित्त साईबाबांचे दर्शन घेतले. आषाढी एकादशीनिमित्त पहाटे मंगलस्रानानंतर साईंच्या समाधीवरील मूर्तीवर पुष्पहार व सुवर्ण आभूषणांबरोबर तुळशीचा हार घालण्यात आला. 'शिर्डी माझे पंढरपूर' या आरतीच्या वेळी उपवासाचा नेवैद्य दाखविण्यात आला. मध्यान्ह आरतीच्या वेळी समाधीवर पांडुरंगाचा फोटो ठेवून फराळाचा महानेवैद्य दाखवण्यात आला. सूर्यास्ताला धुपारतीत 'युगे अठ्ठावीस' ही पांडुरगांची आरती झाली. रात्री पांडुरंगाचा व साईबाबांचा फोटो, पादुका पालखीत ठेवून शहरातून शाही मिरवणूक काढण्यात आली.

रत्नपारख्यांच्या विठ्ठल मंदिरातही गर्दी

• साईबाबांच्या प्रेरणेने लक्ष्मणमामा रत्नपारखी यांना सव्वाशे वर्षांपूर्वी पंढरपूरला चंद्रभागेत सापडलेल्या व साईबाबांनी आलिंगन दिलेल्या आणि विठ्ठल मूर्तीचा 'पाटीलबा असा नामोल्लेख केलेल्या येथील रत्नपारख्यांच्या विठ्ठल मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.

• याच मूर्तीच्या सान्निध्यात बसून संत दासगणूंनी साईबाबांची 'शिर्डी माझे पंढरपूर' या सुप्रसिद्ध आरतीची निर्मिती केली आहे.

फुलांची सजावट, प्रसादात खिचडी

• आषाढी एकादशीनिमित्त कर्नाटक येथील भाविक एस. प्रकाश यांच्या देणगीतून मंदिर व मंदिर परिसरात फुलांची सजावट करण्यात आली. आषाढीनिमित्ताने संस्थान प्रसादालयात व नाष्टा पाकीटात साबुदाणा खिचडीचे आयोजन करण्यात आले होते.

• यंदा २९ हजार उपवासाच्या खिचडी पाकिटांची विक्री झाली, तर किमान साठ हजारांहून अधिक भाविकांनी भोजनात साबुदाणा खिचडीचा लाभ घेतल्याचे संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर व प्रसादालय प्रमुख रमेश गोंदकर यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.