Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भंडारदरा'तून पाणी सोडले पावसाचा जोर : नव्या पाण्याची आवक

 


राजूर : भंडारदरा धरणाच्या जलाशय परिचालन सूचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी बुधवारी सायंकाळी धरणाच्या सांडव्यामधून ६०९ क्युसेकने पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यास सुरुवात झाली. पावसाचा जोर वाढल्याने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी सायंकाळी या धरणातील पाणीसाठा ९२ टक्क्यांपर्यंत म्हणजेच १० हजार १४७ दलघफू होता.

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी दिवसभर पावसाचा जोर होता. मात्र, मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाचे प्रमाण कमी झाले. पुन्हा बुधवारी पावसाने जोर धरला. त्यामुळे भंडारदरा धरणात बुधवारी १४९ दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. बुधवारी सायंकाळी चार वाजता धरणाचा एक लोखंडी वक्र दरवाजा अर्ध्या फुटाणे उचलत ६०९ क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात केली, असे धरण शाखा अभियंता अभिजीत देशमुख यांनी सांगितले.

मागील वर्षी २०२३ मध्ये पाऊस सुरू होण्यापूर्वी भंडारदरा धरणातील पाणीसाठा ५ हजार ६१० दलघफू होता, तर ३१ जुलै २०२३ रोजी धरणातील पाणीसाठा ९ हजार ५३० दलघफू होता. तुलनेने यावर्षी धरणातील सुरुवातीचा पाणीसाठा अवघा २७५ दलघफू असतानाही ३१ जुलै रोजी पाणीसाठा १० हजार १४७ दलघफू झाला.

निळवंडेतील पाणी वाढले

या अगोदर धरणातून वीजनिर्मितीसाठी ८३० क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे आता या धरणातून एकूण १ हजार ४३९ क्युसेकने पाणी नदीपात्रात पडत आहे. या पाण्यामुळे आता निळवंडे जलाशयातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार आहे. सायंकाळी सहा वाजता निळवंडे धरणातील पाणीसाठा ४ हजार ४७७ दलघफू इतका होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.