ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश : महाद्वाराबाबत प्रतीक्षा
शिर्डी : साई संस्थान मंदिर परिसराचे चारही गेट आत-बाहेर जाण्यासाठी भाविक व ग्रामस्थांना खुले करा, या मागणीसाठी गेले काही दिवसांपासून ग्रामस्थांचा आंदोलनाच्या माध्यमातून रेटा सुरू आहे. बुधवारी या आंदोलनाला यश आले. साई संस्थानने दक्षिण बाजूचे चार क्रमांकाचे महाद्वार खुले केले आहे. मात्र, महाद्वार क्रमांक तीन अद्यापही पूर्णपणे खुले झाले नसल्याने या मागण्यांचा पाठपुरावा सुरू राहील, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
माजी नगराध्यक्ष कैलास कोते, शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, किशोर गंगवाल, बाळासाहेब लुटे, नीलेश कोते, संदीप पारख, बाबासाहेब कोते, सुधाकर शिंदे, दीपक वारुळे, नितीन कोते, गोगुळ ओस्तवाल, रवींद्र गोंदकर, मनोज लोढा, विकास गोंदकर, नरेश पारख, कैलास आरणे, रवींद्र कोते, सचिन लुटे, नीलेश गंगवाल आदी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने साई संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांची भेट घेऊन मागण्यांची कैफियत मांडली. मागण्या पूर्ण न केल्यास २१ ऑगस्टपासून महाद्वार ४ समोर उपोषणास बसण्याबाबत निवेदन दिले होते.
याबाबत सीईओ गाडीलकर सकारात्मक प्रतिसाद देत महाद्वार ४ पूर्णपणे उघडण्याबाबत आणि साई उद्यान याठिकाणी साईभक्तांच्या सुविधेसाठी पेड पास युनिटदेखील सुरू करण्याबाबत निर्देश दिले. यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनीही ग्रामस्थांच्या मागणीचे समर्थन केले. महाद्वार ३ खुले करण्यासंदर्भात संस्थानच्या तदर्थ समितीशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ, अशी ग्वाही गाडीलकर यांनी दिल्याचे ग्रामस्थांच्यावतीने सांगण्यात आले.
१५ दिवसांची दिली होती मुदत
• साईबाबा मंदिराचे चारही गेट खुले करणे, चारही गेट जवळ मोबाइल, चप्पल स्टैंड, सशुल्क दर्शन पास
व्यवस्था व लाडू काऊंटर असावे, या मागण्यांसाठी शिर्डी शहर व्यापारी संघटना व शिर्डी ग्रामस्थ यांच्यावतीने साई संस्थान प्रशासनास मोच्र्याद्वारे निवेदन देण्यात आले होते.
• या मोर्चाद्वारे सदर मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात साई संस्थान प्रशासनास १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता.
• परंतु या काळात महाद्वारे खुली करण्याबाबत कारवाई झाली नव्हती.