संरक्षण कायद्यासाठी मुख्यमंत्री लिहिणार पत्र
मुंबई : दहा दिवसांपासून सुरू असलेले निवासी डॉक्टरांचे काम बंद आंदोलन अखेरीस गुरुवारी मागे घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवासी डॉक्टर संघटनेच्या (मार्ड) प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर करण्यात आले. केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायद्यासाठी मुख्यमंत्री केंद्राला पत्र लिहिणार आहेत.
गेल्या दहा दिवसांपासून राज्यात निवासी डॉक्टरांचा संप असल्यामुळे रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णसंख्या घटली असून नियमित शस्त्रक्रिया खोळंबल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्यातील निवासी डॉक्टर संघटनाच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री शिंदे याच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी बैठकीस राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर आदी उपस्थित होते.