शिर्डी व कोपरगाव पोलिस ठाण्यांत चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
कोपरगाव : महाऑनलाइन प्रणालीद्वारेवितरित डिजिटल जात प्रमाणपत्रात फेरफार केल्याप्रकरणी एका सेतू चालकावर शिर्डी पोलिस ठाण्यात व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी जोडलेल्या उत्पन्न प्रमाणपत्रात फेरफार केल्याप्रकरणी तिघांविरोधात कोपरगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिर्डी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून महाऑनलाइन प्रणालीद्वारे डिजिटल जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येते. डिजिटल वितरित करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रामध्ये फेरफार करून अनधिकृत खोटा दाखला दिल्याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाणे येथे सेतूचालक विशाल नागेश दवंगे (रा. कोपरगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालय, शिर्डी यांच्याकडे प्राप्त नॉन क्रिमिलेअर प्रस्तावासमवेत सादर करण्यात आलेल्या उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये फेरफार करण्यात आलेला असल्याची बाब नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची तपासणी करताना निदर्शनास आली. त्याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश कोपरगावच्या निवासी नायब तहसीलदारांना देण्यात आले होते. त्यानुसार पडताळणीकरिता उत्पन्न दाखलेदेखील बनावट वितरित करण्यात आल्याचे सिद्ध झाले.त्यामुळे गुन्हा दाखल करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले होते.त्यानुसार कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात सेतूचालक विश्वेश्वर द्वारकानाथ बागले (रा. कोपरगाव), आतिश भाऊसाहेब गवळी (रा. मढी, ता. कोपरगाव) व सुनील लक्ष्मण शिंदे (रा. काकडी, ता. कोपरगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोटे दस्तऐवज तयार केले
या गुन्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या नावाचा व पदनामाचा गैरवापर, मूळ दस्तऐवजामध्ये खाडाखोड करून खोटे दस्तऐवज तयार करणे, शासनाची दिशाभूल करणे, राजमुद्रेचा गैरवापर करणे, शासकीय लोगोचा गैरवापर करणे, शासनाची प्रतिमा मलिन करणे या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पडताळणी करून घ्या - आहेर
नागरिकांनी फसवणूक टाळण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, शिर्डी व राहाता तसेच कोपरगाव तहसील कार्यालयाकडून प्राप्त होणाऱ्या डिजिटल दाखल्यांची पडताळणी संकेतस्थळावर प्रमाणपत्राचा बारकोड टाकून करून घ्यावी, असे आवाहन शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी केले आहे.