शिर्डी : नाते दृढ करणारा व सुरक्षेची हमी देणारा सण म्हणून भारतीय संस्कृतीत रक्षाबंधन सणाची ओळख आहे. या पार्श्वभूमीवर हजारो भाविक साईबाबांना राखी अर्पण करत असतात. यंदा छत्तीसगड राज्यातील भाविकांच्या साईमाउली परिवाराने बाबांना तब्बल पाच फूट रुंद व छत्तीस फूट लांबीची राखी पाठवली आहे. या राखीचे वजन जवळपास पस्तीस किलो आहे. मंदिर परिसरात ठेवलेली ही राखी भाविकांसाठी आकर्षण ठरत आहे.
दरवर्षी लेह-लडाख येथे सैनिकांना अशा प्रकारची भव्य राखी पाठवणाऱ्या या परिवाराने यंदा साईबाबांसाठीही राखी पाठवली आहे. छत्तीसगड मधील बिलासपूर येथील कलाकार दिलीप दिवाकर पात्रीकर यांनी ही राखी तब्बल दहा दिवस परिश्रम घेवून बनवली आहे. यात फायबर, प्लाय, मोती, जरी, बुटी, रेडीयम आदींचा उपयोग करण्यात आला आहे. साईसंस्थानचे सीईओ गोरक्षगाडीलकर, वंदना गाडीलकर, डेप्युटी सीईओ तुकाराम हुलवळे, ज्योती हुलवळे, बिलासपुरच्या साईमाऊली परिवाराचे प्रतिनीधी प्रबोध राव यांच्या हस्ते या राखीचे विधीवत पुजन करण्यात आले. यावेळी मंदिर प्रमुख विष्णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, नवनाथ मते आदींची यावेळी उपस्थीती होती.
नवविधा भक्तीची थीम
साईबाबांनी आपल्या निर्वाण समयी आपल्या भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना नवविधा भक्तीचे प्रतीक असलेली नऊनाणी दिली होती. त्या नवविधा भक्तीची थीम घेऊन ही राखी बनवण्यात आलेली आहे.यातील प्रत्येक नाणे श्रीमद भागवत आणि श्री रामचरितमानस यांच्या नवविधा भक्तीचे एक वैशिष्ट्य दर्शवते, तेच या राखीमध्ये प्रतिबिंबित झाले आहे. मध्यभागी साईबाबांचा अर्धपुतळा आहे.या राखीच्या दोन्ही बाजूंच्या बंधावर साईसच्चरित्रातील वचने लिहीलेली आहेत.